साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे नाव राज्यभर चर्चेत येत आहे. त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा अनेक भागात दौरे देखील सुरु आहे. नुकतेच अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाकडून इशारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली.
चौंडी येथील अहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली. या सरकारने आजपर्यंत आमचा उपयोग करून घेतला. यांचा मानसन्मान आम्ही वाढवला. मात्र आता आमच्या लेकरांचा मानसन्मान वाढवण्याची वेळ आलीये मात्र आता हेच आमच्याविरोधात दंड थोपटायला लागलेत. मात्र आता आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय मागे हटणार नाही.’ तसंच,’सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नाही. विश्वासाहर्ता गमवायची नसेल तर सरकार आरक्षण देईल. आता धनगर आणि मराठा एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे-पाटील यांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन आणि उपोषण केले. जरांगे-पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने आज संध्याकाळपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यांनी आमच्या दारातही यायचं नाही. आरक्षण देणार असेल तरच चर्चा करू. अन्यथा चर्चा नाही. एक तासही वेळ सरकारला देणार नसल्याचे, जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.