साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देशभरासह परदेशी असे लाखाे भाविक सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा वैश्विक संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात म्हणजेच शिर्डी येथे साई बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले हाेते. गेल्या दहा दिवसांत तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार रुपये भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली आहे.
दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई भक्तांनी अलोट गर्दी केली हाेती. दिवाळी आणि भाऊबीज सण साजरे झाल्यावर भक्तांनी साईबाबांच्या दर्शनाला पसंती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साई मंदिर परिसरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले हाेते. साईंच्या दरबारात देशभरासह परदेशी भाविकही हजेरी लावत असतात. युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, रशीया, चेक आणि डेन्मार्क या देशांतील ३७ महिला आणि १५ पुरुष अशा ५२ परदेशी भक्तांनी नुकतीच साई मंदिरास भेट दिली हाेती. सर्व परदेशी साईभक्तांनी साई संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद भोजनाचा लाभ देखील घेतला हाेता.