साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मोठे उपोषण सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. व्हायरल क्लिपमधील आवाज भुजबळांचाच असल्याचं म्हटलं जातंय. रविवारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर आता भुजबळांनी स्वत: आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘आता ओबीसी काही वाचणार नाही.’, असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्यावरून बरेच राजकीय दावे प्रतिदावे झालेत. यावरून छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे. “राज्यात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे. बऱ्याच आमदारांची घरं पेटवली जातायत. ओबीसी कार्यकर्त्यांचं हॉटेलही पेटवलं जात आहे. त्यामुळे या घटनांवर कुणीतरी काही बोललं पाहिजे. फक्त एका व्यक्तीने नाही तर सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात बोललं पाहिजे, असा माझ्या बोलण्याचा अर्थ असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसंच मी देखील ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो. आपण आपलं दु:ख एकजुटीने अन् एकमुखाने मांडले पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.