साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात मोठी उसळी दिसत आहे तर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत एका दिवसात कांद्याचे प्रतिक्विंटल भाव 820 रुपयांनी वाढले आहेत. दररोज आवक कमी-कमी होत असल्यामुळे ही दरवाढ होत आहे. लासलगाव बाजारसमितीत गुरुवारी उन्हाळ कांदा सरासरी 4625 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. त्यात शुक्रवारी 4925 म्हणजेच 300 रुपयांनी वाढ झाली.
गुरुवारी सर्वाधिक दर 5001 रुपये इतका होता तो शुक्रवारी 5820 पोहोचला. एकीकडे उन्हाळ कांदा संपत असताना दुसरीकडे लाल कांदा हळूहळू बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. शुक्रवारी फक्त एका वाहनातून लाल कांदा बाजार समितीत आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव आता चढेच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात तेजी दिसत आहे. लासलगाव, साक्री, कोल्हापूर, अकोला, मुंबई, धुळे, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कांद्याचा थोडा वधारला आहे. जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शुक्रवारी कांद्याला विक्रमी पाच हजारांहुन अधिक भाव मिळाला. शेतकऱ्यांना 5327 रुपयांचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे उत्पन्न खर्च वगळून शेतकऱ्यांच्या हातात दिवाळी सणासाठी काही रक्कम शिल्लक राहण्याची शक्यता आहे.








