१५ ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया प्रारंभ
SD-Seed ; जळगाव (साक्षीदार न्युज ) ;- एसडी-सीडचे आधारस्तंभ माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने प्रकल्प प्रमुख सौ. रत्नाभाभी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती योजना जून २००८ पासुन निरंतर सुरु आहे. “गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे” या उद्दात्त ध्येयपुर्तीकरिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना २०२४ साठी जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना एसडी-सीडच्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता
· विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा.
· विद्यार्थ्याचे एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा अधिक नसावे.
· दहावी : ग्रामीण विभागातील विद्यार्थी किमान ८५ टक्के गुण तर शहरी विभाग ९० टक्के गुण
· बारावी: ग्रामीण विभागातील विद्यार्थी किमान ७० टक्के गुण तर शहरी विभाग ७५ टक्के गुण .
· सी ई टी /सी पी टी, नीट, जे.ई.ई. समकक्ष परीक्षेत उत्तम गुण
· दिव्यांग / एकल पालक / निराधार विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.
· शासकीय व खाजगी महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थांना ऑनलाईन इंटरनेटद्वारे अर्ज भरण्याची सोय
विद्यार्थ्यांना एसडी-सीडच्या www.sdseed.in या वेबसाईटवर विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक स्वतंत्रता दिवस १५ ऑगस्ट २०२४ पासून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरु राहील.
ऑनलाईन अर्ज भरून एसडी-सीड कडे पाठविण्याची प्रक्रिया
एसडी-सिडच्या वेबसाईटवर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या भरण्याविषयी सर्व विस्तृत माहिती व मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पोच पावतीची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक व बंधनकारक असणारी सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्यांनी ते एसडी-सीड कार्यालयात ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावीत.
विद्यार्थ्यांना एसडी-सीड व्यतिरिक्त इतर विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी एसडी-सीडच्या वेबसाईट वर ज्ञानकोष या विभागात सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजिण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती योजनेचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ. रत्नाभाभी जैन, कार्यध्यक्षा मीनाक्षी जैन आणि गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.