Biometric Attendance | पारोळा | साक्षीदार न्यूज | नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जाकीर पिंजारी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण राहून कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होईल. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे संतप्त झालेल्या जाकीर पिंजारी यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या मागणीला स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळताना दिसत असून, नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. निवेदन देताना जाकीर पिंजारी यांच्यासह मलिक एम आय एम कुरेशी, आरिफ कुरेशी, अख्तर पिंजारी, खलील शेख, आकीब बेलदार, जावेद कुरेशी, आरिफुद्दीन शेख, आका कुरैशी, मुजाहिद कुरेशी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









