Measles | साक्षीदार न्यूज | एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील एकविरा माता आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेत गोवराचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब २४ जुलै २०२५ रोजी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने उपाययोजना राबवण्यात आल्या. आश्रमशाळेचे सचिव विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची प्रकृती आता सुधारत असून, सर्वांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी सोडण्यात आले आहे.
आजाराची लक्षणे दिसताच आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रभावाने आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्वरित उपचार सुरू केले, तर काही गंभीर लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे हलवण्यात आले. उपचारांमुळे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना घरी परत पाठविण्यात आले आहे. यामध्ये नवीन गोवरसदृश आजाराची लक्षणे असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची नोंद नाही, तसेच व्हेंटिलेटरची गरज भासलेला कोणीही नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गोवराच्या साखळी तोडण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी पालकांसोबत घरी राहण्याच्या सूचना दिल्या. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले असून, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे.
ग्रामीण रुग्णालय, एरंडोल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांची काळजी घेतली. सचिव विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजारी विद्यार्थ्यांना दूध, फळे, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.
पालकांशी संवाद साधून गोवराबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थी आश्रमशाळेत परतल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार गोवर प्रतिबंधक लसीकरण आणि नियमित आरोग्य तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि शिक्षण सुरळीत चालू राहील, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.