साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | पुणे जिल्ह्यात अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कार चालकाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच या प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण पेठमध्ये झालेल्या अपघातावेळी कार चालक आणि साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघडकीस झाले आहे. मद्यधुंद कार चालकाने पाच ते सहा वाहनांना आणि पादचाऱ्याला धडक दिली होती. पुण्यातील ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता झेड ब्रीज जवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणी वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय ४४ ) या दोघांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता केळकर रस्त्यावरून एक भरधाव कार टिळक चौकाकडे चालली होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकापासून काही अंतरावर भरधाव कार आली. त्यानंतर या भरधाव कारने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्याजवळ पाच ते सहा वाहनांना धडक दिली.भरधाव कारची पादचारी विश्वनाथ राजोपाध्ये यांना जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कार, दोन रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे.