साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक मोठ मोठ्या शहरात महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामांना गती येत असतांना एक धक्कादायक बातमी चिपळूणमधून समोर आली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले आहेत. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. आता या पुलाचे बांधकाम सुरू असताना धोका निर्माण झालाय. काम सुरु असलेल्या पुलाच्या आतील सळ्या दिसत आहेत. त्यामुळे या पुलाच्या कामाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या घटनेच कोणीही जखमी झालेले नसले तरी, भविष्यासात मोठा धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पुलाचे सध्या काम सुरु आहे. त्यातच या पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला होता. असे तेथील काही नागरिकांनी सांगितले आहे. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच या कामाच्या दर्जाकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.