साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | मध्य प्रदेशातील ७ जणांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना चोपडा पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या जनरेटरसह महिंद्रा पिकअप वाहन व दरोडा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व हत्यारांसह त्यांना अटक केल्याची कारवाई २२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याची मोठी घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ७ जण दरोडा टाकण्याच्या तयारीने २२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रस्त्यावरील तापी सूतगिरणी रोडवर दिसून आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी पोलिसांचा सापळा रचत सात जणांना जेरबंद केल्याची कारवाई केली आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्हयातील सेंधवा येथील दादला सीराम नरगावे (वय २०), सीयाराम बेलोरसिंग चव्हाण (वय २३), जगदीश दमडीया नरगावे (वय २४), ईकेश रामलाल सोलंकी (वय १९), अर्जुन बळीराम आर्य (वय १९) या पाच जणांसह दोन अल्पवयीन मुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लोखंडी रॉड, मिरची पूड, पकड, दोन लोखंडी पाने, चाकू, करवत यासह पाच लाख किंमतीचे महिंद्रा कंपनीचे जनरेटर मशीन तसेच ३ लाख किमतीची महिंद्रा पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी त्यांना रांगेहात पकडले असून त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन ठाण्यात भादवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक घनशाम तांबे करत आहेत.
पोलिसांची तत्परता आरोपी जेरबंद काही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तापी सूतगिरणी परिसरात फिरत असल्याची माहिती पोहेकॉ संतोष पारधी यांना मिळाली. त्यानंतर संतोष पारधी व सपोनि अजित सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेतला असता तीन जण मिळाले. तर ७ जण फरार झालेत. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने जंगलात उर्वरित आरोपींचा शोध घेतला असता चौघांना ताब्यात घेतले. दरोड्याची मोठी घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळली आहे.