साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सात दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शांतेत सुरु असतांना या आंदोलनाला गालबोट लावून ठिकठिकाणी जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, कायदा हातात घेतल्यास गुन्हे दाखल करू, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आवाहनानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. मात्र, शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट देखील लागलं आहे. समाजकंटकांनी आंदोलनाचा फायदा घेत काही ठिकाणी दगडफेक तसेच जाळपोळ केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू व्हिडीओ पोस्ट केल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.
पोलिसांनी अशा २९ आक्षेपार्ह व्हिडीओचा शोध घेतला असून हे व्हिडीओ कुणी पोस्ट केले याचा तपास केला जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील समाजकंटकांना इशारा दिला आहे. सर्वांना शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे, पण हिंसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा लोकांवर पोलिसांकडून कलम ३०७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.