साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही महिन्यापासून नाराज असल्याची चर्चा जोर धरीत आहे पण त्यांनी आता यावर मौन सोडत विरोधकांना फटकारले. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या वाढलेली दिसते.लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.परंतु विविध प्रश्न असताना रोज कुणी ना कुणी काही विधाने करते. कुणी आ रे म्हटलं की दुसऱ्याने का रे म्हणायचे. ही शिकवण आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. संस्कृती नाही हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. मी लेचापेचा माणूस नाही. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना फटकारले आहे.
अजित पवार म्हणाले की, दिवाळीच्या काळात मला डेंग्यू झाल्यानं १५ दिवस आजारात गेले. दुर्दैवाने मी जेव्हा टिव्ही बघायचो, पेपर वाचायचो तर मला राजकीय आजार आहे अशी विधाने केली गेली. मी लेचापेचा माणूस नाही. गेली ३२ वर्ष माझी मते मी स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतो. राजकीय आजार माझ्या स्वभावात आणि रक्तात नाही. कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. अमित शाह यांना भेटायला गेलो तर तक्रार करायला गेलोय अशी बातमी, तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही. काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असते असं त्यांनी सांगितले.
वाचाळवीरांबाबत मी कुठल्याही पक्षाचा उल्लेख केला नाही. मी दोन्ही बाजू म्हटल्या, त्यात सगळेच आले. कुणाला वैयक्तिक टीका करायची नाही. माझ्यासह सर्वांनी त्याचे आत्मचिंतन करायचे आहे. राज्यात इतर अनेक प्रश्न आहे. प्रत्येकाला आपापल्या समाजाला आरक्षण मागण्याचा हक्क आहे. त्यात कुणाचे दुमत नाही. पण ते देताना कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकले पाहिजे. मागील काळात जे आरक्षण दिले ते दुर्दैवाने हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे त्या घटकांना असं वाटतं की राज्यकर्ते आम्हाला खेळवतायेत का? त्यातून समज गैरसमज निर्माण होतात. नवीन पिढीच्या मनात वेगळी भावना वाढीला लागते असं अजितदादा म्हणाले.