Municipal Corporation Election जळगाव | साक्षीदार न्यूज | महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक ६ मधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागलेल्या या प्रभागात माजी नगरसेवक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रभावी नेतृत्व धीरज मुरलीधर सोनवणे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला.
प्रभाग ६ ‘क’ मधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सोनवणे यांनी पहिल्याच दिवशी व्यापक संपर्क मोहीम राबवत विजयाचा निर्धार स्पष्ट केला. प्रचाराची सुरुवात त्यांनी गणेश नगर येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आणि श्रीफळ वाढवून केली. यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे पदाधिकारी, पॅनलमधील उमेदवार आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे सांगत सोनवणे यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून व पुष्पहार अर्पण करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सोनवणे यांनी सांगितले की, प्रभागातील प्रलंबित नागरी समस्या, मूलभूत सोयीसुविधा आणि पारदर्शक प्रशासन यावर आपले लक्ष केंद्रित राहणार आहे. मशाल चिन्हासह मैदानात उतरलेल्या सोनवणेंच्या या झंझावाती प्रचारामुळे प्रभाग ६ मधील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांमध्येही हालचाल वाढली आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या जनसमर्थनामुळे येत्या दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.








