साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांचे भव्य स्वागत व सभेच्या नियोजनासाठी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पदमालय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांचे पाळधीत भव्य स्वागत करण्यात येईल व तेथून त्यांची रॅली काढण्यात येणार असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत मराठा समाजातर्फे करण्यात येईल, त्यानंतर सायंकाळी जळगाव शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात त्यांची सभा होईल, असे बैठकीत ठरले आहे.
मनोज जरांगे-पाटील हे दि.३ रोजी धुळे येथील सभा आटोपल्यानंतर जळगाव येथे येणार आहेत. रस्त्यांत त्यांचे पारोळा व एरंडोल येथे स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर पाळधी येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच तेथून दुचाकी रॅली काढण्यात येणार असून खोटेनगर स्टॉप येथे देखील स्वागत करण्यात येणार आहे. तेथून शहरात आल्यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी शहरातील बालगंर्धव खुले नाट्यगृहात भव्य सभा होणार असून जरांगे पाटील यांचा रात्रीचा मुक्काम जळगावात राहणार आहे. दुसऱ्या दिवशी दि.४ रोजी सकाळी ८.३० वाजता ते येथून पुढील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सकल मराठा समाजातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे.
या बैठकीला राम पवार, प्रमोद बळीराम पाटील, कुलभूषण पाटील, संतोष पाटील, निलेश पाटील, अशोक शिंदे, सुरेंद्र पाटील, गोपाल दर्जी, सुरेश पाटील, राहुल पवार, प्रफुल्ल पाटील, नवनाथ दारकुंडे, सुरेश भापसे, दिपक चव्हाण, सचिन वाघ, आकाश हिवाळे, गणेश पाटील, सुनिल गरूड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.