साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरवाली सराटीत जावून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी व मराठा आरक्षणाचा वाद सोडवावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. ते एका शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेण्याची विनंती केली आहे. ते मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत, तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.