Deputy Chief Minister
साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात नेहमीच टोलनाक्या प्रकरणी मनसे आक्रमक होत असते. मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र या भाजपा-शिवसेनेच्या जाहिरनाम्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केला आहे.
फडणवीसांनी केलेल्या या दाव्याचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून पैसे दिलेले आहेत’, असा दावा फडणवीसांनी केला आहे.
त्यावर राज ठाकरे म्हणाले हे खरं आहे का? म्हणजे याला धादांत खोटं म्हणायचं का? मग टोलनाक्यावरील, रोड टॅक्सचे पैसे जातायत कुठे? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात, पैसे मिळत असल्याने टोल बंद होणं अशक्य, असं राज ठाकरे म्हणाले.आपलं टोलचं आंदोलन २००९-१० च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्याना हे टोल मिळतात कसे? यानंतरही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले.