IPL 2026 | साक्षीदार न्यूज | IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर रोमांचक विजय मिळवला. या सामन्याचा खरा हिरो ठरला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबई इंडियन्सविरुद्ध जसप्रीत बुमराहचा पहिला चेंडू ८८ मीटरवर पाठवणारा वैभव, या सामन्यातही तितक्याच आक्रमक अंदाजात दिसला. त्याने जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या अनुभवी गोलंदाजांवर निर्भीड फटकेबाजी करत अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल इतिहासातील संयुक्तरीत्या तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर वैभव आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त भागीदारी रचली. दोघांनी केवळ ३७ चेंडूंमध्ये १०८ धावांची भागीदारी करत RCB च्या गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला. पॉवरप्लेमध्येच राजस्थानने १ बाद ९७ धावा करत सामन्यावर पकड मजबूत केली.
वैभव सूर्यवंशीने २६ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मात्र शतकापासून तो थोडक्यात दूर राहिला. कृणाल पांड्याने त्याची विकेट घेत राजस्थानला धक्का दिला. दरम्यान, RCB कडून सुरुवातीला विराट कोहलीने जलद ३२ धावा केल्या. त्यानंतर रजत पाटीदार (६३), वेंकटेश अय्यर (नाबाद २९) आणि रोमारिओ शेफर्ड (२२) यांच्या जोरावर RCB ने ८ बाद २०१ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. शंभर धावांआधी ६ विकेट्स गमावूनही त्यांनी उभा केलेला हा स्कोअर उल्लेखनीय ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात कायम ठेवली. वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलने जबाबदारी स्वीकारत नाबाद ८१ धावा केल्या. त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. या सामन्यात रवींद्र जडेजाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि २०० विकेट्स पूर्ण करत मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. हार्दिक पांड्यानंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला. शेवटी राजस्थानने १८ षटकांत ४ बाद २०२ धावा करत सहज विजय मिळवला आणि IPL 2026 पॉइंट टेबलमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले.









