Ration Card E-KYC साक्षीदार न्यूज | १९ जुलै २०२५ | रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुरवठा विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास सप्टेंबर २०२५ पासून संबंधित लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य वितरण कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डवरील प्रत्येक लाभार्थ्याला आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासह समाजातील गरजू व्यक्तींना लाभ मिळेल, असा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन आपल्या आधार कार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी एप्रिल आणि जुलै २०२५ अशा दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही हजारो लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.
पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी (१६ जुलै) झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी, ई-केवायसीला यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर २०२५ पासून केवळ ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळेल. ज्या लाभार्थ्यांचे केवायसी प्रलंबित असेल, त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागेल. याची जबाबदारी पूर्णपणे लाभार्थ्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असे पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ यांनी नाशिकसह धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे.
सिन्नर तालुक्यातील परिस्थिती
सिन्नर तालुक्यात तब्बल ३४,६१५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि पुरवठा निरीक्षक विवेक जमधडे यांनी लाभार्थ्यांना तातडीने केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. रेशन दुकानदारांनीही वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. कमी ई-केवायसीमुळे दुकानदारांवरही जबाबदारी निश्चित होणार असल्याने त्यांनी लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
लाभार्थ्यांना आवाहन
पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, ३१ जुलै २०२५ ही ई-केवायसीसाठी अंतिम मुदत आहे. यानंतर सप्टेंबर २०२५ पासून धान्य वितरण बंद झाल्यास त्याची जबाबदारी लाभार्थ्यांची स्वतःची असेल. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तातडीने रेशन दुकानात जाऊन आधार लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण करावे, असे पुरवठा विभागाने कळविले आहे.