Anti Corruption Bureau | सुनिल भोळे | रावेर तालुक्यातील चोरवाड नाका परिसरात गुरुवारी अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) विभागाने धडक कारवाई करत स्टेट एक्साईज विभागातील एका अधिकाऱ्यावर कार्यवाही केली. दारू वाहतुकीस परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर असून, त्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित अधिकारी हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे, या अधिकाऱ्याकडून यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व अधिकार काढून घेतले होते. मात्र, असे असतानाही ते चोरवाड नाका परिसरात कारवाई करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दारू वाहतुकीवर कारवाई न करण्याच्या बदल्यात रकमेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रावेर तालुक्यात तसेच स्टेट एक्साईज विभागात खळबळ उडाली आहे. अधिकार काढून घेतल्यानंतरही अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात कारवाई करत असल्याचा प्रकार गंभीर मानला जात असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एसीबीकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत स्पष्टता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.








