साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | देशात उत्तम प्रवासासाठी नेहमीच भारतीय रेल्वेचे नाव समोर येत असते पण गेल्या काही महिन्यापासून याच रेल्वेमधील घडलेल्या घटनामुळे मोठी खळबळ उडत आहे. नुकतेच झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या एका मद्यधुंद निवृत्त सैनिकाने गुरुवारी रात्री सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. आरोपी हरपिंदर सिंग धनबादहून रेल्वेच्या बी-8 बोगीत चढला होता. गाडी मातारी स्थानकावरून जात असतानाच हरपिंदर सिंगने त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. त्यामुळे बोगीत गोंधळ निर्माण झाला. हरपिंदर सिंग धनबाद येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच ट्रेनमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर राजधानी एक्सप्रेस कोडरमा स्थानकावर थांबवण्यात आली आणि आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी बी-8 बोगीच्या टॉयलेटमधून एक काडतुस जप्त केले आहे. आपल्याकडून चुकून गोळी सुटल्याचे हरपिंदर सिंगचे म्हणणे आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे.