Rohit Nikam BJP यंदा जळगाव शहराची भुमिका ठरणार निर्णायक ; नवीन चेहऱ्याला संधीची दाट शक्यता !
Rohit Nikam BJP साक्षीदार न्यूज | सुनील भोळे | देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी असून मराठा समाजाचा उमेदवार दिला जाणार हे निश्चित आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाची सामाजिक आणि भौगोलिक रचना लक्षात घेता जळगाव शहराची मोठी भुमिका असणार आहे. विद्यमान खासदारांबद्दल जळगावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी, जनतेत असलेला रोष लक्षात घेता जळगावकर असलेल्या नवीन चेहऱ्याला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप इच्छुकांच्या यादीत जळगावकर असलेले रोहित निकम यांचे नाव पुढे येत आहे. पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे.
यंदा जळगाव शहराची भुमिका ठरणार निर्णायक !
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय गर्दीत उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे पारडे जड असून विद्यमान खासदार उन्मेष पाटील देखील पुन्हा उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघ जळगाव शहरापासून चाळीसगावपर्यंत विस्तारला असला तरी प्रामुख्याने जळगाव शहर आणि ग्रामीणचे मतदार सर्वाधिक आहे. जळगाव शहराशी निगडित खासदारांच्या बाबी लक्षात घेतल्या असता ढीगभर अडचणी आहेत.
रोहित निकम यांची उमेदवारी निश्चित ?
जळगावकर जनताच नव्हे तर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील विद्यमान खा.उन्मेष पाटील यांच्यावर नाराज दिसतात, त्यातच मंत्री महाजनांचा गट तर खासदारांना बॉयकॉटच करतो. नुकतेच जिल्ह्यात येऊन गेलेल्या पक्षश्रेष्ठींच्या कानी देखील उन्मेष पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पक्षांतर्गत व बाहेरील यंत्रणांच्या मार्फत केलेल्या सर्व्हेतून देखील उन्मेष पाटील यांचे रेटिंग घसरले असल्याची चर्चा आहे. नुकतेच काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जळगाव आणि रावेर येथील खासदार बदलले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यातल्या त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात रोहित निकम यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
भाजपच्या चौकटीत रोहित निकम बसतात परफेक्ट !
एकंदरीत सर्व घडामोडी आणि मुद्दे विचारात घेता विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचा पत्ता कट झाला तर दुसऱ्या एखाद्या मराठा, दमदार चेहऱ्याचा विचार होऊ शकतो. जळगाव शहरातील रहिवासी असलेले आणि अल्पावधीत मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय गोटामध्ये सामील झालेले रोहित निकम यांचे नाव सध्या पुढे येत आहे. जळगाव शहरवासी, जिल्हा दूध संघाचे संचालक, निवडणुकीचे मायक्रो नियोजन, तरुण, उच्चशिक्षित, सर्वसमावेशक चेहरा म्हणून रोहित निकम भाजपच्या चौकटीत परफेक्ट बसतात. रोहित निकम यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास जळगाव जिल्ह्यातच भाजपची ताकद आणखी वाढेल, हे निश्चितच आहे.
सहकार क्षेत्रात निकम परिवाराचे घनिष्ठ नाते..
रोहित निकम हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे सदस्य आहेत तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत तसेच माजी जिल्हा परीषद सदस्याही आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून तर काका अॅड.उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत. एवढेच नव्हे तर, रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांच्या नावाला जळगाव जिल्ह्यात एक वेगळं सामाजिक आणि राजकीय वलय आहे.जिल्हा दूध संघाचे संचालक असल्यामुळे त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याशी त्यांचा संपर्क आहे . त्यामुळे त्यांना शेतकऱयांच्या व्यथा देखील चांगल्या प्रकारे ते जाणून आहेत.
वकील घराण्याची देशाला अभिमान करावा अशी कामगिरी .
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे असलेल्या रोहित निकम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा संदेश देता येणार आहे. विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांचे राष्ट्रीय पातळीवरही मोठे नाव आहे शिवाय युवा कार्यकर्ता असलेल्या रोहित निकम यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. सध्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून रोहित दिलीप निकम हे काम पाहत आहे.
निकम परिवार आणि सामाजिक हितसंबंध..
रोहित यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा मतदार संघातून १९५५ ते १९५९ ला आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे निकम परिवाराची नाळ अजूनही चोपडा तालुक्यात जुळून आहे. आजोबा, काका, आई आणि स्वतःचा सामाजिक संपर्क दांडगा असल्याने तो त्यांच्यासाठी प्लस पॉइंट मानला जातो. दुसरीकडे रोहित निकम यांचा मोठा काळ आणि रहिवास जळगाव शहरात असल्याने त्यांचा मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. मराठा समाजाचा एक तरुण, तडफदार आणि शांत स्वभावाचे असलेले रोहित निकम हे आयटी सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा थेट तरुणांशी संपर्क आहे. शिवाय भाजपच्या बुथ कमेटीवरही ते काम करीत असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींकडून पार्लमेंट्री बोर्डमध्ये रोहित निकम यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.







