Rupali Chakankar मुंबई | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? नाशिकमधील अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर खरातचे अनेक कारनामे समोर आले. मात्र, राजकारणात खळबळ उडाली ती रुपाली चाकणकर यांच्या एका व्हिडिओमुळे. यामध्ये चाकणकर या खरातची ‘पाद्यपूजा’ करताना दिसत होत्या. एका महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा भोंदू बाबाचे समर्थन कशा करू शकतात? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांचा ‘हस्तक्षेप’ आणि राजीनामा: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना पद सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशानंतर चाकणकर यांनी तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि आपले राजीनामा पत्र सादर केले. पत्रात त्यांनी ‘वैयक्तिक कारणास्तव’ आणि ‘स्वेच्छेने’ पद सोडत असल्याचे नमूद केले असले तरी, यामागे खरात प्रकरणाचीच पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट आहे.
बावनकुळेंचा इशारा: या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “अशोक खरात प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करेल. भोंदूगिरी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.”








