Shirdi | साक्षीदार न्यूज । साईबाबांच्या निर्वाण दिनाची (१५ ऑक्टोबर) नोंद राष्ट्रीय शासकीय कॅलेंडरमध्ये व्हावी, या मागणीसाठी शिर्डीत साईभक्तांच्या उपस्थितीत विचारमंथनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. सिद्धपीठ शिर्डी साईदरबार दिल्ली यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या विचारमंथनात आजी-माजी खासदार, साईसंस्थानचे अधिकारी, ग्रामस्थ तसेच देश-विदेशातून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमात “२००० सालच्या अगोदरची शिर्डी आणि बदललेली शिर्डी” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रीय कॅलेंडरवर साईबाबांच्या निर्वाण दिनाची नोंद व्हावी
साईभक्तांच्या मागणीस पाठिंबा दर्शवित सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज म्हणाले की साईबाबा हे विश्वविख्यात संत असून त्यांचा महानिर्वाण दिन म्हणजे पुण्यतिथी राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या महात्म्यांचा उल्लेख राष्ट्रीय स्तरावर असणे गरजेचे आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केले की १५ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये घ्यावा, या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असून संसद अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडणार आहे. यासाठी मी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हणलय.साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की
साईबाबांच्या कार्याचा प्रसार करण्याचा संस्थानचा कायम प्रयत्न असतो. निर्वाण दिन राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट व्हावा यासाठी साईभक्त जे.पी. सिसोदिया गेली आठ वर्षे प्रयत्न करत आहेत. या मागणीला संस्थान प्रशासन देखील साथ देणार असून यामुळे साईबाबांच्या कार्याचा प्रचार-प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केलय.
शिर्डीच्या विकासाचे पुस्तक प्रकाशित
चित्रपट *‘शिर्डी के साईबाबा’*चे निर्माते आशिम खेत्रपाल यांनी या प्रसंगी शिर्डीतील विकासावर आधारित पुस्तक प्रकाशित केले.
त्यांनी सांगितले की,
“२००० पूर्वीची आणि नंतरची शिर्डी यात झालेल्या विकासात्मक बदलांवर आधारित हे पुस्तक प्रथम इंग्रजीत प्रकाशित झाले असून लवकरच १६ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. जगभरात साईबाबांच्या शिकवणीचा प्रसार व्हावा, हा या प्रकाशनाचा उद्देश आहे.यामुळे १५ ऑक्टोबर हा साईबाबांच्या निर्वाण दिनाचा राष्ट्रीय कॅलेंडरवरील उल्लेख व्हावा, या मागणीला आता व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कार्यक्रमाला सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, साईभक्त आशिम खेत्रपाल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, भाजप नेते सचिन तांबे, सर्जेराव कोते, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अजित पारख, सुजित गोंदकर, सुनील बारहाते, प्रमोद मेढी, पारस जैन, साई मनोज, संजय सिंग तसेच कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. सिसोदिया यांच्यासह देश-विदेशातील साईभक्त, ग्रामस्थ आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.