Shinde Group यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील साकळी गावात आज (४ एप्रिल) होणाऱ्या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही प्रमुख पदाधिकारी आज शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, या प्रवेशामुळे अपेक्षित राजकीय बळकटी मिळण्याऐवजी उलट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिंदे गटाला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दीर्घकाळ विरोधात असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान दिले जात असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना, “ज्यांनी अनेक वर्ष विरोध केला, त्यांनाच आता स्थान दिले जात असेल, तर आमची भूमिका काय?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, आजच्या प्रवेशानंतर साकळीतील एक प्रभावी समाज शिंदे गटापासून दूर जाण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. या समाजाचा स्थानिक राजकारणावर प्रभाव असल्याने त्यांच्या भूमिकेचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
तसेच, शिंदे गटातील काही कार्यकर्तेही नाराजीमुळे बाजूला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकीकडे प्रवेश सोहळा आणि दुसरीकडे वाढती नाराजी – या दुहेरी परिस्थितीत साकळीतील राजकारण अधिकच चुरशीचे होण्याचे संकेत आहेत.
आजचा दिवस साकळीच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा ठरणार असून, पुढील घडामोडींवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







