Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत पार पडला. या कार्यक्रमातून समाजात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
मेश ऍग्रोचे संचालक युनूस मन्सूरी आणि रफिक मन्सूरी यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास यावल परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह साकळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खेवलकर यांनी प्रभावीपणे केले.
या प्रसंगी साकळी येथील प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन यांनी आपल्या भाषणातून मेश ऍग्रोच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मन्सूरी बंधूंचे वडील स्व. शेफी मन्सूरी यांनी आपल्या आयुष्यात साकळी गावात सर्व समाजाला एकत्र आणण्याचे मोठे काम केले होते. धर्मभेद विसरून एकोप्याची भावना रुजवण्याचे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
“युनूस मन्सूरी आणि रफिक मन्सूरी हे आपल्या वडिलांचा तोच एकात्मतेचा वारसा पुढे नेत आहेत. ते केवळ यशस्वी उद्योगपती नाहीत, तर समाजासाठी नेहमीच तत्पर असणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व आहेत,” असे महाजन यांनी नमूद केले.
या सोहळ्यामुळे साकळी गावात हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले. सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना जपणाऱ्या मेश ऍग्रोच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
हा ईद मिलाद सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, समाजातील एकात्मता, बंधुभाव आणि सौहार्द वाढवणारा प्रेरणादायी उत्सव ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेश ऍग्रोच्या सर्व कामगारांनी विशेष सहकार्य केले. शेवटी, मेश ऍग्रोचे संचालक युनूस मन्सूरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.








