Yawal Taluka Grampanchayat साकळी | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील साकळी गावातील स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ आरोग्यापुरता मर्यादित न राहता, तो ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. एकीकडे गाव विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे आंबेडकर नगरसह संपूर्ण गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः महिला स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था ग्रामपंचायतीच्या असंवेदनशीलतेचा पुरावा देत आहे.
प्रशासनाला जाग येईना! ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. उघड्या गटारी, रस्त्यावर साचलेले सांडपाणी आणि ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे. मात्र, याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसते.
सदस्यांची ‘मालकी’ आणि उद्धट उत्तरे! सर्वात धक्कादायक प्रकार वार्ड क्रमांक १ मध्ये समोर आला आहे. आपल्या हक्काच्या समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून चक्क अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. “आम्हाला सांगू नका, जे करायचे ते करा,” अशा उद्धट भाषेचा वापर करून काही सदस्य स्वतःला गावाचे सेवक नव्हे तर ‘मालक’ समजू लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीच जर जनतेला तुच्छ लेखत असतील, तर दाद मागायची कोणाकडे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
दिखाऊ स्वच्छता आणि पत्रकारांवर दबाव! ग्रामपंचायत केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी अधिकारी येणार असतील तिथेच ‘दिखाऊ’ स्वच्छता करते, असा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. या गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांना देखील काही पदाधिकाऱ्यांकडून धमकावण्याचे आणि अवमानकारक भाषा वापरण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारा असून, प्रशासनाच्या या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात साकळीकरांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रशासकीय हस्तक्षेपाची मागणी येत्या काळात जर स्वच्छतेचा प्रश्न सुटला नाही आणि नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साकळी ग्रामस्थांनी दिला आहे. वरिष्ठांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून ‘मालक’ बनू पाहणाऱ्यांना शिस्त लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.








