साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | राज्यात नेहमीच अपघाताच्या मालिकेने चर्चेत असलेले समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे एका विवाहितेचा मृतदेह आढळल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास एका विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. मात्र, या महिलेचं वय ३० ते ३५ वर्ष असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गालगत असलेल्या गुमगाव-वडगाव मार्गावरून मंगळवारी काही शेतमजूर शेतात जात होते. या मजूरांना एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. मृत महिलेच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच तिच्या कपाळावर कुंकू लावण्यात आले होते. या महिलेचा गळा देखील चिरलेला होता. हे भयंकर दृष्य पाहताच शेतमजूर धास्तावले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना महिलेच्या मृतदेहाजवळ काही वापरलेली कंडोमची पाकिटे, सोन्याचे कानातले, अंगठी, ब्लेड आणि पूजेचे साहित्य सापडले. यासोबत घटनास्थळी पोलिसांना फिकट रंगाचे जॅकेटही सापडले.