NepalCrisis काठमांडू / मुंबई । नेपाळमध्ये (Nepal) सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर उसळलेल्या जनआंदोलनाने थेट सरकार पाडले. संतप्त नागरिकांनी संसदेत घुसून जाळपोळ केली, न्यायालय परिसरात आग लावली तर गृहमंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाले. त्यामुळे नेपाळमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत भारतालाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
राऊत म्हणाले, “Nepal today! ही परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते. सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!” असे ट्विट करत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना टॅग केले. यासोबतच आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या युवकाचा व्हिडिओ शेअर करून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, या आंदोलनामुळे नेपाळमध्ये सत्तांतर निश्चित झाले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून काही मंत्री देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत काठमांडूचे महापौर आणि लोकप्रिय रॅपर बालेन शाह (Balendra Shah) हे पंतप्रधानपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
बालेन शाह यांचा प्रवास आगळा आहे. अभियंता असूनही त्यांनी रॅपर म्हणून सामाजिक आणि राजकीय भ्रष्टाचारावर आवाज उठवला. 2022 मध्ये त्यांनी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी जोरदार विजय मिळवत इतिहास रचला. 2023 मध्ये त्यांचा समावेश TIME 100 Next यादीत झाला.
नेपाळमधील घटनांनी शेजारी देशांनाही धक्का बसला आहे. सोशल मीडिया बंदीसारख्या निर्णयामुळे नागरिकांचा संताप कसा उसळू शकतो याचे हे ताजे उदाहरण असल्याचे मत व्यक्त होत आहे.