साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यावरुन आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली. अशा खोट्या गुन्ह्यांमुळे गृहमंत्रालयाची विकृती उघड झाली, अशी टीका संजय राऊतांनी केली.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या आदल्यादिवशी शिवतीर्थावर येऊन शिंदे गटाने धिंगाणा घातला. त्यांच्या अरेरावीला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यावरच विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिंदे गटाच्या महिलांनी काय अरेरावी केली, याचे व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आहे. शिवसैनिकांवर वियनभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करुन गृहमंत्रालयाची विकृती उघड झाली आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. आमचा संघर्ष न्यायालया चालू राहील. त्यादिवशी बेईमान गटात महिला घुसल्या. त्यावेळची त्यांची भाषा पाहा, भूमिका पाहा. त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. फक्त विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. याला विकृती म्हणतात.
संजय राऊत म्हणाले, खरे तर या राज्यात देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदी आहेत की नाही? असा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीस यांना कोंडून ठेवले आहे काय? आणि त्यांच्या जागी इतर दुसरा कोणी निर्णय घेत आहे, याचाही तपास करावा लागेल. मात्र, सरकारच्या अशा कारभारामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.