Pesa Demand साक्षीदार न्युज । 24 मार्च 2025 | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सावखेडासिम या आदिवासी गावाचा ‘पेसा’ कायद्यांतर्गत समावेश न झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो आदिवासी बांधवांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदिवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी यांच्या सहभागाने हे आंदोलन यावलच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर काढण्यात आले.
सावखेडासिम हे गाव शासकीय नियम आणि लोकसंख्येच्या निकषांनुसार ‘पेसा’ (पंचायत उपबंध विस्तार कायदा) अंतर्गत येण्यास पात्र आहे. तरीही, गेल्या अनेक वर्षांपासून या गावाचा समावेश ‘पेसा’मध्ये झालेला नाही. यामुळे गावातील आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी यावल पंचायत समिती कार्यालय परिसरातून शेकडो आदिवासी बांधवांनी एकत्र येत प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला आणि सुमारे सहा तास आंदोलन केले.
आंदोलकांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी लावून धरली. अखेर पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी सावखेडासिमला ‘पेसा’ अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, प्रतिभाताई शिंदे यांनी सरकारवर दबाव वाढवत, या मागणीचा त्वरित पाठपुरावा न झाल्यास 28 मार्च रोजी आदिवासी विकास मंत्री उईके यांचा घेराव घालण्याचा इशारा दिला. अखेर, पवार यांनी लेखी आश्वासन देत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे कबूल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
या घटनेने परिसरात चर्चेला उधाण आले असून, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा हा लढा पुढेही तीव्र होण्याची शक्यता आहे.