साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक राज्यात धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक घटना रेल्वे प्रवासातून समोर आली आहे. चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घली असून सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या विषबाधेच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून पुण्याकडे येणारी ही रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला पोहचली. तेव्हा रेल्वेमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये खानपानाची सोय देण्यात आली आहे. अनेकदा सकाळी पॅक केलेल अन्न सायंकाळी, रात्री देण्यात येते त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.