साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शिंदे गटाचे मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील न्यायालयासमोर आज हजर राहण्याचे आदेश कोर्टाने संजय राऊतांना दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत आज कोर्टात हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप दादा भुसे यांनी संजय राऊतांवर केला आहे. याप्रकरणी दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर संजय राऊत यांनी खुलासा करावा, असे आदेश देत कोर्टाने संजय राऊतांना कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर संजय राऊत यांनी प्रसिध्द केला, असा आरोप मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. दादा भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सामना या वर्तमानपत्रातून बदनामी करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, गिरणा बचावच्या नावाखाली बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील हजारो शेतकऱ्यांकडून 178 कोटी 25 लाख रुपयांचे शअर्स गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स 47 सभासदांच्या नावे दाखवून हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’कडेही तक्रार करून दादा भुसेंवर कारवाईची मागणी केली आहे.