Shirdi Dogs Diabetes साक्षीदार न्युज । शिर्डी, 22 मार्च । शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील स्थानिक कुत्र्यांना मधुमेह (डायबिटीस) सारख्या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. भाविकांनी मंदिरात अर्पण केलेला प्रसाद आणि त्यातील साखरेचे प्रमाण यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
साईबाबा मंदिरात दररोज लाखो भाविक हे दर्शनासाठी येतात आणि प्रसाद म्हणून गोड पदार्थांचे वाटप करतात. हा प्रसाद अनेकदा रस्त्यावरील कुत्र्यांनाही दिला जात असतो . गेल्या काही महिन्यांत येथील कुत्र्यांमध्ये अस्वस्थता, थकवा आणि डायबिटीसची लक्षणे दिसू लागली आहेत. पशुवैद्यकांनी केलेल्या तपासणीत काही कुत्र्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे आढळले.
“हा एक असामान्य प्रकार आहे. कुत्र्यांना सहसा डायबिटीस होत नाही, पण सतत गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे,” असे स्थानिक पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. भाविकांनी दिलेला प्रसाद कुत्र्यांसाठी जीवघेणा ठरत असल्याने यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे .
स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मंदिर परिसरात प्रसादाचे व्यवस्थापन आणि कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हा प्रकार पशुचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीही आश्चर्याचा विषय ठरला आहे.