Shirpur Merchants Bank साक्षीदार न्युज | शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांचा विश्वासघात करून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, लेखापाल, वसुली अधिकारी आणि कर्जाची परतफेड न करणाऱ्या ४९ जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनदी लेखापाल अजय राठी यांनी बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणादरम्यान हा गैरप्रकार उघडकीस आणला. लेखापरीक्षणातून असे समोर आले की, बँकेने वाटप केलेल्या अनेक कर्ज प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्या. विशेषतः बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रसन्ना जैन यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करत आपले बंधू हर्षद जैन यांना विनातारण कर्ज मंजूर केले. यासाठी त्यांनी बँकेचे व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांच्याशी हातमिळवणी केली. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत हे गैरव्यवहार घडल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले.
या प्रकरणात एकूण ४९ कर्जदारांचा समावेश आहे, ज्यांनी कर्ज घेऊनही त्याची परतफेड केली नाही. कर्ज घेण्यासाठी सांगितलेल्या व्यवसायाऐवजी या रकमेचा गैरवापर करून ती दुसऱ्या कामांसाठी वापरल्याचा संशय आहे. यामध्ये हितेश जैन, एकनाथ भंडारी, केतनकुमार जैन, श्रीराम विठोबा, शांतीलाल जैन, खुदाबक्ष तेली, दिलीपकुमार अग्रवाल, गिरीजा भागवत, गिरीश भागवत, गोविंदलाल अग्रवाल, प्रमोद धाकड, भगवान अग्रवाल, शेख खतीब, जतीन जैन, संगिता शाह, सचिन शाह, शेख कामील, सुरेश अहिरे, अमोल जैन, भूषण चौधरी, चंचालाल पटेल, रमेश कमलानी, प्रवीण देशमुख, रामेश्वर अग्रवाल, जितेंद्र गिरासे, रितेश जयस्वाल, नितीन माळी, भगवान दलाल, सुरेशलाल गुजराती, जया जैन, अमरदीप सिसोदिया, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, दिलीप धाकड, मंगलसिंग जाधव, राजेंद्र अरुजा, सौरव भंडारी, जयपाल गिरासे, निखील अग्रवाल, निमराज चौधरी आणि सिद्धार्थ थोरात यांचा समावेश आहे.
या सर्वांनी बँकेकडून विनातारण कर्ज घेतले आणि त्याची परतफेड न करता बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांचा विश्वासघात केला. बँकेचे अध्यक्ष प्रसन्ना जैन, व्यवस्थापक संजय कुलकर्णी, महेश गुजराथी आणि दिलीप कापडी यांच्यासह तत्कालीन कर्ज अधिकारी, लेखापाल आणि वसुली अधिकाऱ्यांनी या फसवणुकीत संगनमत केल्याचा आरोप आहे. काही कर्ज प्रकरणे तारण झाल्याचे किंवा परतफेड झाल्याचे दाखवले गेले, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे लेखापरीक्षणातून उघड झाले.
या तक्रारीच्या आधारे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. बँकेतील या गैरव्यवहारामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.