Gram Panchayat बोदवड |सुरेश कोळी | तालुक्यातील शिरसाळा गावातील ग्रामसभांच्या आयोजनात गंभीर घोटाळ्याची तक्रार समोर आली आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 53 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतने दरवर्षी किमान चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. मात्र, शिरसाळा ग्रामपंचायतने ही अनिवार्यता फक्त कागदोपत्री पूर्ण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, खरोखरच कोणतीही ग्रामसभा आयोजित केली गेली नव्हती. गावकऱ्यांनी ग्रामसेवकाकडे चौकशी केली आणि ठराव पाहिले असता राजू गुलाब पारधी यांचे नाव अनुमोदक म्हणून दाखवले होते. तर बाहेरगावी राहणाऱ्या एका व्यक्तीचे नाव सूचक म्हणून नोंदवले होते. यावरून गावकऱ्यांना संशय आला.
ऑगस्ट महिन्यात गावकऱ्यांनी ग्रामसेवकांना 20 तारखेला ग्रामसभा घेण्याचा आग्रह धरला. त्या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली, पण त्यात मागील ग्रामसभेची प्रक्रिया वाचून दाखवली नाही. गावकऱ्यांनी केलेल्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
नंतर 25 तारखेला दवंडी देऊन 26 तारखेला पुन्हा ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत मागील प्रक्रिया वाचून दाखवली असता राजू पारधी यांचे नाव अनुमोदक म्हणून दिसले. त्यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना साफ सांगितले की, “आम्ही कधीच ग्रामपंचायत सभेला उपस्थित राहिलो नाही, तर आमचे नाव कसे अनुमोदक म्हणून घातले?” या प्रश्नाला ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे गावकऱ्यांना लक्षात आले की, ग्रामसभा फक्त कागदावर दाखवल्या जात होत्या.
गावकऱ्यांनी अनेक कामांची बिले तपासली. गटार साफ करण्याची बिले तर आहेत, पण प्रत्यक्षात काम झाले नाही. तसेच, संडासीवर टाक्या नसल्याचेही गावकऱ्यांनी नमूद केले. “टाक्या कुठे गेल्या?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या सर्व प्रकरणाची तक्रार आता आपले सरकार पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. या विषयाची चौकशी करण्याचे आदेश विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), बोदवड यांना देण्यात आले आहेत. गावकऱ्यांचे लक्ष आता या चौकशीकडे लागून आहे आणि न्याय मिळेल याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.