Shocking ! जळगाव, १ ऑगस्ट २०२५ – जळगाव शहरातील माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी (वय ५०) यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जयनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नातेवाइकांनी तातडीने बंटी जोशी यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
बंटी जोशी हे जळगाव महानगरपालिकेत अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. त्यांचे हसतमुख आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणे यामुळे ते समाजात लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मित्रपरिवार, नातेवाईक आणि समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, शरद तायडे, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, पीयूष कोल्हे, सरिता माळी, कैलास सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांनी रुग्णालयात हजेरी लावली.
या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहेत. बंटी जोशी यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.