साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | राज्यातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बटाट्याचा पाला खाल्ल्याने तब्बल ४० गाईंना विषबाधा झाल्याचा घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. यामध्ये गीर जातीच्या वीस गाईंचा मृत्यू झाला असून ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील निरगुडसर गावातील शेतकरी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या मालकीच्या या गाई आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून या निरगुडसर या परिसरात राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड हे राहतात. त्यांच्यांकडे अनेक नीर गाई असून त्याच्यावर ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारच्या थोरांदळे गावात बटाटा काढणी सुरू होती. या शेतातील कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना विषबाधा झाली. ज्यामध्ये १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत राजस्थामधील व्यापाऱ्याचे १६- १७ लाखांचे नुकसान झाले आहे. बटाट्यावरील रासायनिक फवारणी,आणि रोगराई मुळे विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.