साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक परिवारात छोटे मोठे वाद नेहमी होत असतात, पण अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका परिवाराने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील वारसीगुडा येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यांने गुरुवारी दि.१७ रात्री उशिरा आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत स्वत:चे ही आयुष्य संपवले आहे. सदर कुंटुंब वारसीगुडा येथील गंगापुत्र कॉलनीत भाडे तत्वावर वास्तव्यास होते. चित्रलेखा(वय 30), पती कृष्णा (वय35) आणि मुलगी (वय ४) अशी गळफास घेतल्यांची नावे आहेत. घरमालकाने या जोडप्याला फोनवरून संपर्क केला होता. त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने घरी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घराचे दार बंद होते. बराचवेळ दरवाजा ठोठवल्यानंतर ही कोणत्याही प्रकारचे उत्तर न दिल्याने घरमालकाने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर पोलिसांना तिघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या मयत जोडप्याने घराच्या भिंतीवर तीन संशयित व्यक्तींची नावे लिहून त्यांना या आत्महत्येला जबाबदार ठरवले होते. मात्र, या बद्दलचे कोणतेही कारण लिहीले नव्हते.
मयत पत्नीने यापूर्वी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचे काम केले होते. त्याच प्रदर्शनात भिंतीवर लिहीलेले ३ संशयित व्यक्ती हे तिचे सहकर्मचारी होते. कृष्णा अलीकडे कॅब ड्रायवर म्हणून काम करत होता. तसंच या जोडप्याला काही दिवसापासून रोजगार नव्हता. त्यामुळे टोकाचे पाऊल उचल्यामागे आर्थिक कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे.गुरुवारी रात्री त्यांच्या घरातून टीव्हीचा मोठा आवाज येत असल्याने घरमालकाने त्यांना फोन करुन आवाज कमी करण्याचा प्रयत्न ही केला होता. पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. मात्र टीव्हीचा आवाज दुसरा दिवस ऊजाडून ही बंद न झाल्याने रूममालकास काही तरी अघटीत झाल्याचा संशय आला. त्यामुळे घरमालकाने घराचा दरवाजा ठोठावला परंतु कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. या प्रकरणात जो काणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.