साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरातील टेलर कामाचे दुकानाला आग लागल्याची घटना २५ नोव्हेबर रोजी घडली होती. या आगीत दुकानदाराचे १ लाख ८७ हजारांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुना खेडी रोड येथील रहिवासी प्रल्हाद छगन बाविस्कर (वय-४९) हे टेलरींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जुना खेडीरोडवर जितू टेलर नावचे दुकान आहे. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या टेलर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत शिवलेले व न शिवलेले कपडे, मशिनरी साहित्य असा एकुण १ लाख ८७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
यावेळी महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दुकानदार प्रल्हाद बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.








