साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | ज्यातील अनेक जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या झाली असून यात प्रज्वल मेश्राम (वय २० वर्ष) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील कुडवा येथील गोंडीटोला रोड चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रज्वल याचे आरोपी तरुणाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबधाची कुणकुण कुटुंबियांना लागली होती. माझ्या बहिणीला फोन करू नकोस, असं आरोपीने मृत तरुणाला सांगितले होते. मात्र, जीवपाड प्रेम असल्याने मृत प्रज्वल आरोपीच्या बहिणीला वारंवार फोन करीत होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने प्रज्वलचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने रविवारी रात्री प्रज्वलला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने चाकूने सपासप वार करीत प्रज्वलची हत्या केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा एक मित्र झटापटीत जखमी झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.