साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३ | सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणाचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे साखरेच्या धर्तीवर संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निर्यात शुल्क अनुदान जाहीर करावे, तसेच निर्यातीअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड होते. बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा एकमेव आणि सर्वात मोठा आयातदार आहे. पण केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे संत्र्यांची निर्यात ठप्प झाली आहे. निर्यात होत नसल्यामुळे देशातल्या बाजारपेठेतही संत्र्यांचे दर पडले आहेत. अडचणीतील संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.