Maharashtra Critical Water Problem साक्षीदार न्युज ; – नेमेची येतो दुष्काळ ही परिस्थिती सध्या महाराष्ट्राला लागू आहे. भूतलावरच्या सततच्या प्रदूषणामुळे नद्या नाल्यांचे पाणी पूर्णपणे दुषित झालेले आहे. छोट्या गावापासून ते मुंबई सारख्या मोठ्या शहरा पर्यंत स्थानिक संस्था त्यांच्या हद्दीतील रोजचे मलमूत्र स्वच्छ करण्यास असमर्थ आहेत . याच्या मुळे मोठ्या प्रमाणावर, प्रक्रिया न केलेला मलमूत्र तेथील नदी नाल्या मध्ये सोडला जातो. भरीसभर म्हणून छोट्यामोठ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी सुध्दा नियमाप्रमाणे स्वच्छ न करता तसेच नदी नाल्या मध्ये सोडले जाते. त्याच बरोबर शेतातील खात, कीटकनाशक मिश्रित पाणी देखील असेच सोडले जाते. नदीचे हेच पाणी पुढे धरणातील पाणी साठ्यामध्ये मिसळून ते पाणी पण प्रदूषित करते. म्हणजे सद्य परिस्थिती मध्ये आपल्या राज्यातील एक हि नदी स्वच्छ राहिलेली नाही. त्यातील पाणी विना प्रक्रिया वापरता येत नाही. आणि प्रक्रिया हि नेहमीच खर्चदायक असते .
याच्या मुळेच आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भूगर्भातील पाण्यावर आपली तसेच शेतीच्या पाण्याची गरज भागवत असतो . सततच्या उपश्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खालावत चाललेली आहे. झाडतोडी, शहरीकरण याच्यामुळे पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण ३५ % वरून जवळ जवळ ८ % आसपास आले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा भविष्यात आपल्याला कितपत मदत करेल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये सरासरी १३०० mm पाउस पडतो . म्हणजेच १००० चौरस फुटावर साधारणपणे १,१०,००० लिटर पावसाचे पाणी पडते. एवढी प्रचंड ताकत या पावसाच्या पाण्यामध्ये आहे. राज्यामध्ये जर जनजागृतीकरून जनतेला पावसाच्या पाण्याच्या या शक्तीची माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याच्याबरोबरच रेन वाटर हार्वेस्टिंग चे महत्व पण सांगणे गरजेचे आहे. रेन वाटरहार्वेस्टिंग हा भारतीयांना नवीन प्रकार नाही. आजपासून ६५०० वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये त्यावेळी पण आपल्या पूर्वजांनी या तंत्राचा वापर करून पावसाच्या पाण्याचा वर्षभर शेतीसाठी व स्वतःच्या वापरासाठी उपयोग करुन घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आपल्या सर्व किल्यावर याच तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती , ती आजपण आपल्याला पहायला मिळते. आजमात्र आपण सर्वच या परंपरागत चालत आलेल्या प्रयोगास विसरून गेलो आहोत.
२०२४ च्या पावसाळ्याच्या आधी आपण सर्वांनी जनजागृती करून पावसाच्या पाण्याचे महत्व, पाण्याची बचत, सांडपाण्याचा वापर, आणि रेन वाटर हार्वेस्टिंग चे महत्व आणि फायदे सर्वांना समजावले पाहिजेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये एक GR शिव कालीन पाणी साठवण योजना या नावाखाली प्रसिध्द झालेला आहे. याच्याद्वारे राज्यातील सर्व शासकीय इमारतीवर रेन वाटर हार्वेस्टिंग करणे हे सक्तीचे केलेले आहे. आपणास मात्र असा प्रयोग कुठल्या शासकीय इमारती वर केल्याचे दिसून येत नाही. आसाच प्रकार मुंबई, पुणे या शहरातील कायद्याच्या अंमलबजावणी बाबत पण दिसून येते . पुणे शहरात २००९ पासून सर्व नव्या इमारतीवर रेन वाटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. पण येथे हि कायद्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. परिणाम म्हणजे करोडो लिटर पावसाचे पाणी भूगर्भात न जाता वाहून जात आहे. आजून हि वेळ गेलेली नाही. लोक प्रतिनिधींनी यात जास्त लक्ष घालणे गरजेचे आहे.
पाणी या क्षेत्रात मी २००३ पासून काम करीत आहे. सर्व प्रथम आम्ही, जुन २००३ मध्ये पुणे येथील आमची सोसायटी Rooftop Rainwater Harvesting system चा वापर करून टँकर मुक्त केली. तेंव्हा पासून आतापर्यंत, आमच्या संस्थेने शहरी भागात जवळपास ६५० यशस्वी प्रयोग राबवले आहेत. यामुळे जवळपास ६५ लाख चौ फूट छतावर पडणारे पावसाचे जवळपास ८५ कोटी लिटर पावसाचे पाणी भुजलात सोडण्यात आले आहे. या मुळे हे सर्व ६५० प्रयोग टँकर मुक्त झाले आहेत. रोज २६०० हून अधिक पाण्याचे टँकर लागत होते.या प्रयोगा मुळे वर्षाला टँकर वर होणारा लक्षावधी रुपयांचा खर्च पूर्णपणे बंद झाला आहे.
तसेच आता पर्यंत ग्रामीण भागात आम्ही १०६ गावामध्ये जल आत्मनिर्भर अभियान राबवून, ही सर्व गावे पण टँकर मुक्त केली आहेत, तसेच प्रती वर्षी जवळपास या गावातील इमारतीच्या छतावर पडणारे ३० कोटी लिटर हून अधिक पावसाचे पाणी भूजल मध्ये सोडण्यात यशस्वी झालो आहोत.परिणाम स्वरूप ही सर्व गावे वॉटर टँकर मुक्त झाले आहेत. सध्या आमची टीमने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ३० गावामध्ये असेच अभियान सुरू केले आहे. येत्या पावसाळ्याच्या आधी हे अभियान आम्ही पूर्ण करू.त्यामुळे लवकरच ही गावे पण जल आत्मनिर्भर होतील. या ग्रामीण भागातील सर्व उपक्रमांना आम्हाला ICICI Bank चे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील उपक्रम राबविण्यात पुणे स्थित MAPS Industries ची महत्व पूर्ण भूमिका राहिली आहे.
माझ्या संस्थे तर्फे मी हवी ती मदत जनजागृतीसाठी करण्यास तयार आहे.
कर्नल शशिकांत दळवी
पुणे
९८६०५७७३६४








