साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी काहीना काही संकटात आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना नेहमीच मदत करीत असते. पण सध्या सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती.
मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पण यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची सवंगणी केली आहे. यामुळे आता सवंगणी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगासह येलो मोजॅक, मुळकूज, खोडकूज हे रोग आले होते. यामुळे सोयाबीन हे पिवळं पडत उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्याने लावलेला खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशातच सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देताच सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन काढलाय अशाचे कसे पंचनामे होणार हा प्रश्नच आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ३२ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यापैकी ९० हजार १६६ हेक्टरचा पीक विमाही शेतकऱ्यांनी काढला आहे. पंचनामे झाल्यावर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातं आहे.