साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना नियमित सुरु असतांना आता मुंबईतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुरुवारी एका भरधाव कारने सहा वाहनांना धडक दिल्याने तीन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा जवळ घडली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश असून जखमींपैकी दोघे अत्यावस्थ आहेत.
सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या 100 मीटर आधी हा अपघात झाला. एका इनोव्हा गाडीने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना ईनोव्हा कारने उडवले. या अपघातात ईनोव्हा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे.अपघातात चालक देखील जखमी झाला असून चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे. सुरुवातीच्या धडकेनंतर कारचा वेग वाढला आणि टोलनाक्यावरील आणखी वाहनांना धडक देण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.