साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | देशभरात गेल्या काही वर्षापासून आपल्या चमत्कारातून भविष्य सांगणारे बागेश्वर महाराज ऊर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज चर्चेत आहे. ते सध्या पुण्यात तीन दिवसीय हनुमान कथा कार्यक्रम सुरु आहे. याच दरम्यान आज बुधवारी सकाळी बागेश्वर बाबा यांनी कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या सोबत देहू येथे जाऊन संत तुकाराम महाराजांचे मंदिरात दर्शन घेतले. यावेळी गैरसमजातून आपण संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले होते. कोणत्याही वारकऱ्याच्या भावना दुखविण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावर आज पत्रकारांशी बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या संताची परंपरा भारतीय असून आपण त्यांचा गौरव केला पाहिजे. या संताचा मी एक शिष्य असून त्यांच्याबाबत कोणतेही खेदजनक वक्तव्य करण्याचा माझा उद्देश नव्हता. वारकरी संप्रदाय महान असून आपण आपल्या परंपराचा मान ठेवला पाहिजे.
बागेश्वर बाबा म्हणाले, संत तुकाराम महाराजांबद्दलचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्या माहितीच्या आधारावरच मी तुकाराम महाराजांविषयी ते वक्तव्य केले होते. परंतु त्यावेळी मला त्याबाबत पूर्ण माहिती समजली नव्हती, आता ती माहिती समजल्याने मी माझी चूक दुरुस्त करुन वारकऱ्यांची माफी मागितली आहे. भारत ही संताची भूमी असून आपण आपल्या संत परंपरेचा गाैरव केला नाही तर परदेशी व्यक्ती आपल्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करतील. देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर हे प्राचीन व अदभूत असल्याचे मला दर्शनावेळी दिसून आले.