साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील ठाकरे गट गेली काही दिवसापासून ललित पाटील प्रकरणी सरकारला धारेवर धरीत आहे. यावर आता ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात आक्रमक भाषण केले.
महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त झाला पाहिजे. महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला नको, म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका घेऊन उभे आहोत. आम्ही प्रश्न विचारले की मंत्री धमक्या देतात, अब्रू नुकसानीचा दावा करू सांगतात. मागील दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा केली जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. त्यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
१० ऑक्टोबरला ३०० कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला. मुंबईत ७१ कोटींचे कोकेन जप्त झालो. छत्रपती संभाजी नगरमध्ये २३ कोटींचे ड्रग्ज सापडले. मुळा नदीच्या पात्रात ड्रग्ज सोडण्याचा प्रयत्न झाला. ज्या-ज्या लेकीला, पत्नीला, आईला वाटते की आपल्या घरात व्यसन नको ती प्रत्येक स्त्री माझ्याशी सहमत असेल, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरु? अशी म्हण आहे. या सरकार मधल्या अनेक मंत्र्यांची अवस्था अशीच आहे. गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की, तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले, गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला मागचे नऊ महिने का लपवले गेले,असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी यावेळी विचारला. बात निकलेगीं तो दूर तलक जायेगी असा इशाराच सुषमा अंधारे यांनी सरकारला दिला.