साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | राज्यातील जोरदार अवकाळी पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात मंगळवारी सकाळी झाला आहे. कार आणि बस मध्ये झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती समाेर आली असून हा अपघात बार्शी-सोलापूर रस्त्यावरील सौंदरे गावाजवळ झाल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून बार्शीच्या दिशेने कार निघाली हाेती. बार्शीकडून सोलापूरच्या दिशेने बस चालली हाेती. सौंदरे गावाजवळ या दाेन वाहनांत अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील साेलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकाऱ्यासह चौघे तर बसमधील महिला वाहक आणि एक प्रवासी असे सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. बसच्या समोरच्या भागातील काचा फुटल्या आहेत. दरम्यान जखमींना बार्शीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.