साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादीत दोन गट पडल्यावर दोन्ही गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असतांना आता शरद पवारांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मौन सोडले आहे. त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांना देखील चिमटे घेतले आहे.
अजितदादा गट भाजपसोबत सत्तेत जाऊन काही दिवसांपूर्वीच 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त अजित पवारांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी फुले शाहू- आंबेडकरांचे विचार आणि यशवंतराव चव्हाणांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपण्याची ग्वाही जनतेला दिली होती. विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी स्वत:चा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा केला होता. त्यावर शरद पवारांनी जोरदार चिमटा काढला. शरद पवार म्हणाले, अजित पवारांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार. त्यांनी आता युएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले तरी काही फरक पडत नाही.