साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून ठाकरे गटातील अनेक नेते अडचणीत येत असतांना आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते.
अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
यावर्षी एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईला राजकीय वास येत असल्याची हिरे समर्थकांची तक्रार आहे.दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या तीव्र राजकीय स्पर्धा, आरोप प्रत्यारोपातून प्रशासनाने सुडाच्या भावनेने व राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला आहे.