साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | राज्यात यंदा झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यासाठी राज्यातील सरकारने ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केल्याने आता विरोधक सरकारवर टीका करीत आहे. यात उद्धव ठाकरे गटाने देखील सरकारला चांगलेच सुनावले आहे.
नव्याने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे ‘लॉलीपॉप’ राज्य सरकारने दाखविले आहे. मात्र ते तालुके आणि विभाग कोणते याचा तपशील अद्यापि गुलदस्त्यात आहे. मिंधे सरकारने हा ‘गुलदस्ता’ सत्ताधारी आमदारांना देण्यासाठी दडवून ठेवला आहे का? विकास निधीपासून विकास कामांपर्यंत हे सरकार राजकारणच करीत आहे. दुष्काळासारखा जीवनमरणाचा विषय तरी त्यातून वगळा! चांदवड तालुक्यात तीन दिवसांत दुष्काळात होरपळणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. त्याची तरी चाड बाळगा. मात्र ते सोडून मिंधे सरकार दुष्काळाचीही जुमलेबाजी करीत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने या संदर्भात सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
राज्यातील आणखी काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 40 तालुके सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. त्यात आता आणखी काही तालुक्यांची भर पडणार आहे. अर्थात, हे तालुके कोणते आणि त्यांची संख्या किती, हे अद्यापि जाहीर झालेले नाही. राज्य सरकारने नवीन दुष्काळग्रस्त गावांचे पिल्लू सोडले खरे; परंतु त्याचा तपशील जाहीर न करण्याची हातचलाखी केलीच. 40 तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले त्यावेळीही सरकारचा दृष्टिकोन हाच होता. अर्थात, त्यातही नेहमीचे घाणेरडे राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलेच होते. 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे कसे? असा सवालच विरोधी पक्षांनी केला होता. दुष्काळ हा दुष्काळ असतो. मग तो ओला दुष्काळ असो की, कोरडा दुष्काळ. तो राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्ष, गरीब-श्रीमंत, बागायती-जिरायती असा भेद करीत नाही. त्यामुळे त्याबाबतीत तरी सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थाचा विचार न करता निरपेक्ष निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असते. मात्र राज्यात सध्याचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त राजकारणच केले जात आहे.